
*जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुढील वर्षासाठी ७५१ कोटी ७० लक्ष रुपयांच्या जिल्हा प्रारूप आराखड्यास मंजुरी !*
पालकमंत्र्यांकडून चालू आर्थिक वर्षातील
₹८३४ कोटी ६२ लक्ष निधीच्या कामांचा घेतला आढावा
जळगाव, प्रतिनिधी दि. २ फेब्रुवारी :- जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार अनिल पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार अमोल पाटील, आमदार किशोरआप्पा पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत सन २०२६–२७ या पुढील आर्थिक वर्षासाठी ₹७५१ कोटी ७० लक्ष रुपयांच्या जिल्हा वार्षिक प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यात आली. तसेच चालू आर्थिक वर्षातील ₹८३४ कोटी ६२ लक्ष निधीच्या खर्चाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यामध्ये ₹६१८.९९ कोटी रकमेच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून उर्वरित कामांना आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी तातडीने मान्यता देऊन सर्व निधी वेळेत व दर्जेदार पद्धतीने खर्च करण्याचे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
या निधीतून सर्वसाधारण योजना ₹६७७ कोटी, अनुसूचित जाती उपयोजना ₹९३ कोटी, तर आदिवासी उपयोजना ₹६४ कोटी ६२ लक्ष इतका निधी समाविष्ट आहे. जिल्हा निधी खर्च व प्रशासकीय मान्यता देण्यात जळगाव जिल्हा विभागात प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
बैठकीच्या सुरुवातीस राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारी जिल्हा नियोजन समितीने तयार केलेली चित्रफीत दाखविण्यात आली.
*नाविन्यपूर्ण उपक्रमांचे उद्घाटन*
बैठकीत जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये क्रीडांगण विकास कार्यक्रम, सेवादूत जळगाव वेबसाइट व व्हॉट्सॲप चॅटबॉट, AI आधारित जिल्हा रुग्णालय व धान्य गोदाम देखरेख प्रणाली, तसेच QR कोड आधारित अर्धन्यायिक प्रकरणांच्या ऑनलाईन सुनावणी प्रणालीचा समावेश आहे.
*पुढील वर्षातील ठळक विकास कामे*
पुढील वर्षात जिल्ह्यात शाळांमध्ये क्रीडांगणे, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रामीण रस्ते विकास, सिंचन बंधारे, आदिवासी पाड्यांना वीजपुरवठा, सौरऊर्जा प्रकल्प, आरोग्य सुविधा बळकटीकरण, कॅन्सर तपासणी व्हॅन, नगरपालिकांतील पायाभूत सुविधा, स्पर्धा परीक्षा अभ्यासिका, ITI मध्ये आधुनिक अभ्यासक्रम, अंगणवाड्या बांधकामे, LED पथदिवे व महिला-बालविकास भवन उभारणी आदी कामांचा समावेश आहे.
*पालकमंत्र्यांचे निर्देश*
मंजूर कामे दर्जेदार व मुदतीत पूर्ण करावीत, अपूर्ण कामांसाठी निधी प्रस्ताव तातडीने सादर करावेत, महावितरणची सर्व कामे ई-निविदा प्रक्रियेद्वारे करावीत, तसेच रुग्णालयांमध्ये विशेषतः सर्पदंश औषधांचा तुटवडा होऊ नये, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या.
बैठकीत आमदारांनी दूध भेसळ, कॅन्सर रुग्णसंख्या, रिंग रोड, गुटखा विक्री बंदी यासंदर्भात मुद्दे मांडले. यावर आवश्यक त्या कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले. जिल्ह्यात कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी दोन एस्कॉनसह कॅन्सर तपासणी व्हॅन मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
जळगाव जिल्ह्याला ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात राज्यात प्रथम पुरस्कार व पाणीपुरवठा व स्वच्छता विभागास तृतीय क्रमांक मिळाल्याबद्दल पालकमंत्री, जिल्ह्यातील मंत्री व जिल्हा प्रशासनाच्या अभिनंदनाचा ठराव बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.