
*पाळधीत दृष्टीदानाचा महायज्ञ; शेकडो डोळ्यांना उजेड*
२३५ मोतिबिंदू रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया; ५८३ नागरिकांनी केली नोंदणी
*पाळधी / धरणगाव/ जळगाव प्रतिनिधी दिनांक ९ एप्रिल – डोळ्यांना दृष्टी देणं म्हणजे केवळ वैद्यकीय उपचार नाही, तर एखाद्या कुटुंबाच्या आयुष्यात आनंदाचा दिवा पेटवणं आहे. एका व्यक्तीला दिसायला लागलं की संपूर्ण घर उजळतं – हीच खरी समाजसेवा आहे. सेवा हीच आपल्या राजकारणाची खरी ताकद आहे. गरीब, वंचित माणसाच्या आयुष्यात प्रकाश आणणं, त्याच्या अंधाराशी लढणं – हेच आपलं कर्तव्य आहे आणि अशी कामं सतत सुरू राहिली पाहिजेत.असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यांनी केले.*
समाजसेवेचा खरा अर्थ म्हणजे गरजूंना नवजीवन देणे… आणि हाच जीवनदायी संदेश देणारा दृष्टीदानाचा भव्य उपक्रम पाळधीत साकार झाला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रेरणेतून तसेच जि.प. सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या पुढाकारातून जिपीएस मित्र परिवारातर्फे आयोजित नेत्र तपासणी व मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला याप्रसंगी ते बोलत होते.
पाळधी येथील शासकीय विश्रामगृह परिसरात सकाळी ७ वाजल्यापासून गावा – गावातून आलेल्या आबालवृद्ध नागरिकांनी शिबिरात मोठी गर्दी केली. एकूण ५८३ रुग्णांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी २३५ रुग्णांना पनवेल येथील सुप्रसिद्ध शंकरा नेत्र रुग्णालयात मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले, ज्यामुळे अनेकांच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश उजळणार आहे. या शिबिराला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट देत रुग्णांची आस्थेने विचारपूस केली व उपक्रमाचे कौतुक केले.
शिबिरात सहभागी सर्व रुग्णांसाठी नाश्ता व जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे कोणताही मोबदला न घेता सर्व सेवा पूर्णतः मोफत देण्यात आल्या, यामुळे लाभार्थ्यांनी आयोजकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
या यशस्वी उपक्रमासाठी शंकरा हॉस्पिटलची तज्ज्ञ टीम डॉ. राहुल चौधरी, डॉ. विजय ब्राम्हणे, डॉ. गुरप्रीत राठोड यांच्यासह सर्व वैद्यकीय कर्मचारी, पाळधी आरोग्य केंद्राचे कर्मचारी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चव्हाण, तसेच स्थानिक डॉक्टर, आरोग्य सेवक, आशा सेविका आणि जिपीएस मित्र परिवार, शिवसेना व युवासेना कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. या दृष्टीदान उपक्रमातून होत असलेल्या या सेवाभावी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.