
अवकाळीग्रस्त जळगाव जिल्ह्याला मोठा दिलासा
*37 हजार 991 शेतकऱ्यांसाठी 31 कोटी 14 लाखांची मदत मंजूर*
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याला यश ; 18 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र बाधित
*पाळधी/धरणगाव/ जळगाव प्रतिनिधी दिनांक 18 मे – मार्च 2026 मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला असून जिल्ह्यासाठी तब्बल 31 कोटी 14 लाख 60 हजार रुपयांची मदत मंजूर केली आहे. या मदतीमुळे जिल्ह्यातील 37 हजार 991 शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे. शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील 18 हजार 229.73 हेक्टर क्षेत्र अवकाळी पावसामुळे बाधित झाले होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी 30 एप्रिल 2026 रोजी शासनाकडे मदतीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार 27 मार्च 2023 च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार ही मदत मंजूर करण्यात आली आहे.*
राज्य शासनाने राज्यातील विविध जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांसाठी एकूण 164 कोटी 83 लाख 44 हजार रुपयांची मदत मंजूर केली असून त्यामध्ये जळगाव जिल्ह्यासाठी 31 कोटी 14 लाख 60 हजार रुपयांची मोठी तरतूद करण्यात आली आहे. शासन निर्णयातील विवरणपत्रानुसार जळगाव जिल्ह्यातील बाधित शेतकरी संख्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने ही मोठी मदत मानली जात आहे.
*अवकाळी पावसानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतः बाधित भागांचा दौरा करून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली होती. तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिताताई वाघ तसेच जिल्ह्यातील सर्व आमदारांनी बाधित भागांना भेटी देऊन परिस्थितीची माहिती घेत शासनाकडे मदतीची मागणी केली होती. त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.*
*पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा कोट*
*अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. शासनाने या नुकसानीची गांभीर्याने दखल घेत मदत मंजूर केली आहे. संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. मंजूर झालेली मदत बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी ठरेल.*
-पालकमंत्री, गुलाबराव पाटील