
*“सेवा हेच खरे व्रत” : प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त फिरते नेत्रालय सेवेत*
घंटागाडीचे लोकार्पण, गरजूंना मदतीचा हात; रक्तदान शिबिर व सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस ठरला जनसेवेचा उत्सव
जिल्हाभरातून शुभेच्छांचा वर्षाव; “भावी आमदार” बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण
*पाळधी/धरणगाव/जळगाव, दि. २८ एप्रिल : “सेवा हेच खरे व्रत” या भावनेतून पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, युवा नेते तथा जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील आणि विक्रम पाटील यांच्या पुढाकारातून जीपीएस ग्रुप, पाळधी यांच्या वतीने अत्याधुनिक फिरते नेत्र तपासणी ॲम्बुलन्स जळगाव ग्रामीण भागातील जनतेच्या सेवेत आजपासून दाखल करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उत्साहात पार पडला. प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरातून शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव झाला. शासकीय विश्रामगृह, पाळधी येथे सकाळी ८ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत शुभेच्छुकांची मोठी गर्दी उसळली होती. शिवसेनेचे मुख्यानेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेयांच्यासह आमदार शिवसेनेसह इतर पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी तसेच जळगाव ग्रामीण मतदारसंघातील नागरिकांनी प्रत्यक्ष येवून तर काहींनी फांद्वारे शुभेच्छा दिल्या.*
*आधुनिक फिरते नेत्रालय आजपासून जनतेच्या सेवेत : ग्रामीण आरोग्याला नवा प्रकाश*
यापूर्वी नेत्र तपासणीसाठी ग्रामीण भागातील रुग्णांना पाळधी येथे यावे लागत होते. मात्र आता ही अत्याधुनिक नेत्र तपासणी ॲम्बुलन्स थेट गावोगावी जाऊन नागरिकांची तपासणी करणार आहे. तपासणीनंतर गरजू रुग्णांना मोफत चष्मे देण्यात येणार असून, ज्यांना शस्त्रक्रियेची गरज आहे अशा रुग्णांना पुढील उपचारासाठी पनवेल येथील अत्याधुनिक रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे. “गावातच उपचार” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारा हा उपक्रम खऱ्या अर्थाने सर्वसामान्य व गरजूंसाठी “मायेची दृष्टी” ठरणार आहे. आतापर्यंत १७ हजारांपेक्षा अधिक रुग्णांना दृष्टीदान देणाऱ्या या कार्याचा विस्तार आता संपूर्ण जळगाव ग्रामीण भागात होत असल्याने नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे.
*रक्तदान शिबिर व सामाजिक उपक्रम*
वाढदिवसानिमित्त विविध लोकोपयोगी उपक्रम राबवण्यात आले. दोन दिवसांपूर्वी आयोजित भव्य रक्तदान शिबिरात तब्बल ५५ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली. याशिवाय गरजू विद्यार्थ्यांना वही, पेन, पेन्सिलचे वाटप, आरोग्य केंद्रात फळवाटप तसेच गरजूंसाठी जेवणाचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे हा वाढदिवस केवळ उत्सव न राहता “जनसेवेचा उत्सव” ठरला.
*अग्निशमन वाहन व घंटागाडीचे लोकार्पण*
दरम्यान, नशिराबाद नगरपरिषदेला मिळालेल्या आधुनिक अग्निशमन वाहनाचे लोकार्पण तसेच पाळधी बु. ग्रामपंचायतीतर्फे गावाच्या स्वच्छतेसाठी घंटागाडीचे लोकार्पण युवा नेते प्रतापराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. स्वच्छतेच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात असून गाव स्वच्छ ठेवण्याच्या चळवळीला आणखी चालना मिळणार आहे. अत्याधुनिक नेत्र तपासणी ॲम्बुलन्स व घंटागाडीचे लोकार्पण प्रतापराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख शिवराज पाटील , डी ओ पाटील , सरपंच विजय पाटील, शरद कोळी, माजी सभापती सचिन पवार, मुकुंदराव नन्नवरे, अनिल पाटील, उपमहापौर मनोज चौधरी, श्याम कोगटा, उपनगराध्यक्ष विजय महाजन, माजी जिपचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, नगराध्यक्ष पिंटू पाटील, उपनगराध्यक्ष पंकज महाजन उद्योगपती पती पिंटू कोठारी शरद कसात , गोपाल कसात दिलीप बापू पाटील, बीडीओ किशोर वानखेडे ,ग्राम विकास अधिकारी श्री पाठक, यांच्यासह शिवसेना , इतर पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी तसेच जळगाव ग्रामीण मतदारसंघातील पाधाधिकारी व कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*राजकीय चर्चांना उधाण (चौकट घेणे )*
जळगाव शहरासह मतदारसंघात “भावी आमदार” अशा उल्लेखाचे बॅनर्स झळकताच प्रतापराव पाटील यांचे नाव राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. हा उल्लेख केवळ शुभेच्छांपुरता न राहता जनतेच्या अपेक्षा आणि वाढत्या विश्वासाचे प्रतीक मानला जात आहे. दरम्यान, वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील विविध पक्षांचे नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट घेत शुभेच्छा दिल्या. या भेटीदरम्यान झालेल्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात कुतूहल निर्माण झाले असून, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे “भावी आमदार” हा उल्लेख आता केवळ बॅनरपुरता मर्यादित न राहता चर्चेचा केंद्रबिंदू ठरताना दिसत आहे.
*प्रतापराव पाटील यांचा भावनिक कोट*
“आज माझ्या वाढदिवसानिमित्त मला मिळालेलं जनतेचं प्रेम, आपुलकी आणि आशीर्वाद हे शब्दांत मांडता येणार नाहीत. ही आपुलकी आणि विश्वास माझ्यासाठी खूप मोठी जबाबदारी आहे.माझ्या वाढदिवसाचा खरा आनंद केवळ शुभेच्छांमध्ये नाही, तर जनतेच्या सेवेसाठी काहीतरी चांगलं करण्यामध्ये आहे. प्रत्येक गावात, प्रत्येक घरात आरोग्याची आणि आनंदाची ज्योत पेटवण्याचा माझा प्रयत्न राहील.
तुमचं हे प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद मला आयुष्यभर जनसेवेसाठी प्रेरणा देत राहील—हीच माझ्यासाठी सर्वात मोठी भेट आहे.”
*— प्रतापराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य*